नवी दिल्ली - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज 137 वी जयंती आहे. जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास टि्वट करून त्यांना आदरांजली अर्पण केली. तसेच मोदींनी 2018 मधील 'मन की बात' या कार्यक्रमातील क्लिप शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली.
आज सावकराच्या जयंतीनिम्मित त्यांच्या साहसला माझे नमन, सामजिक सुधारणामधील आणि स्वातंत्र्यलढ्यामधील त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील, असे टि्वट मोदींनी केले आहे. समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.
विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 ला नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला होता. सावरकर हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी तसेच हिंदूसंघटक व हिंदूत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ होते.
सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक व पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिलेली आहे. सावरकरांनी '1857 चा स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ लिहीला. 1857 चा उठाव हे बंड नसून हा एक स्वातंत्रसंग्राम होता, असे मत त्यांनी या पुस्तकात मांडले आहे. 26 फेब्रुवारी 1966 ला सावरकरांचे निधन झाले.