नवी दिल्ली - देशामध्ये शुक्रवारी तब्बल 17 हजार कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. रुग्णांच्या संख्येने पाच लाखांचा टप्पा पार केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. राहुल गांधींनी शनिवारी आपल्या ट्वीटर खात्यावरून 'देशामध्ये कोरोना महामारी वाढत आहे. मात्र, केंद्र सरकारकडे या महामारीला रोखण्यासाठी कुठलेही नियोजन नाही.' असे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशावर असलेल्या संकटाबाबात मौन धारण करून शरणागती पत्करली आहे. तसेच ते महामारीविरोधात लढण्यातही निष्प्रभ ठरले आहेत. याआधी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी हे खरेतर 'सरेंडर मोदी' आहेत अशी टीका केली होती. शुक्रवारी (19 जून) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी चीनने भारतात अतिक्रमण केले नसल्याचे म्हटले होते. यावरून राहुल गांधींसह काँग्रेस पक्षाने पंतप्रधानांवर टीका केली होती.