नवी दिल्ली - आत्तापर्यंत देशभरामध्ये कोरोनाचे ३४ रुग्ण आढळले आहेत. तर हजारो नागरिकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीत मोदींनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
हेही वाचा- लडाख आणि तामिळनाडूत कोरोनाचे तीन रुग्ण, देशभरात ३४ जणांना लागण
रुग्णांना अलिप्त ठेवण्यासाठी पर्याप्त ठिकाणे सोयीसुविधांसह तयार ठेवण्यासाठी मोदींनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच जर कोरोनाचा प्रसार वाढला तर अतिदक्षता विभागांची निर्मिती करण्यासाठी आदेश दिले. आज लडाखमधील दोघांना आणि तामिळनाडूतील एकाला कोरोना झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा -कोंबडी फक्त १० रुपये किलो; अफवांमुळे पोल्ट्री व्यवसायिकांवर आत्महत्या करण्याची वेळ
आढावा बैठकीत आरोग्य मंत्री हर्षवर्धन, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, आरोग्य राज्यमंत्री आश्विनी कुमार चौबे, कॅबिनेट सचिव राजीव गोऊबा, निती आयोगाचे सदस्य विनोद पॉल, सरसेनाध्यक्ष बिपीन रावत आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी उपस्थित होते. याबरोबरच नागरी उड्डान विभागाचे अधिकारी, आरोग्य संशोधन, आपत्ती निवारण विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
हेही वाचा -COVID-19 : गुरुग्राममध्ये आढळला आणखी एक रूग्ण..
सर्व विभागांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले. कोरोनाच्या आजाराबाबत आणि त्यापासून कशी सुरक्षितता बाळगावी याबाबत जनजागृती करण्याबाबत पंतप्रधानांनी निर्देश दिले. आत्तापर्यंत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामाचे त्यांनी कौतुक केले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कोरोना विषाणूमुळे जगभरात आत्तापर्यंत साडेतीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० लाखापेक्षा जास्त नागरिकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. ९० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे.