नवी दिल्ली -सौदी अरेबियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावरून आज पंतप्रधान मोदी हे भारतात परतले आहेत. रियाधमध्ये भविष्यातील गुंतवणुकीवरील पुढाकारासाठी झालेल्या परिषदेमध्ये त्यांनी काल भाषण केले. तसेच, सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सुलतान यांच्यासोबतही त्यांनी चर्चा केली.
सौदी अरेबियाचे सम्राट सलमान बिन अब्दुल अजीज यांच्यासह केलेल्या चर्चेमध्ये नरेंद्र मोदींनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करत, संरक्षणसंबंधी दोन्ही देशांमध्ये (भारत आणि सौदी) असलेल्या सामंजस्याची प्रशंसा केली. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण उद्योगातील सहयोग, अक्षय उर्जा, सुरक्षा सहकार्य आणि नागरी उड्डाण यांसह एकूण बारा सामंजस्य करार करण्यात आले. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सामरिक भागीदारीत अधिक गतिशीलता आणि खोली जोडण्यासंबंधी नरेंद्र मोदी आणि सलमान बिन अब्दुल अजीज यांच्यात 'फलदायी चर्चा' झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.
रियाधमध्ये भविष्यातील गुंतवणुकीवरील पुढाकारासाठी झालेल्या परिषदेमध्ये बोलताना नरेंद्र मोदींनी भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स करण्याचा पुनरुच्चार केला. यासोबतच गुंतवणुकदारांसाठी भारतात व्यापार करणे सोईस्कर व्हावे यासाठी भारत सरकारने घेतलेल्या काही निर्णयांबाबतही ते बोलले. तसेच, काही प्रादेशिक आणि काही जागतीक समस्यांबाबत बोलतानाच त्यांनी हेही स्पष्ट केले, की भारताने २०२४ पर्यंत परिष्करण, पाईपलाईन आणि गॅस टर्मिनल्समध्ये १०० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे.
यासोबतच पंतप्रधान मोदींनी सौदीचे परराष्ट्र मंत्री, उर्जा मंत्री, कामगार आणि सामाजिक विकास मंत्री तसेच पर्यावरण आणि कृषी मंत्र्यांशीदेखील विविध विषयांवर चर्चा केली.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे मोदींची सौदी भेट ही चर्चेचा विषय झाली होती. कलम ३७० हटवल्यानंतर उद्विग्न झालेल्या पाकिस्तानने पंतप्रधान मोदींसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती. त्यामुळे सौदीला जाताना नरेंद्र मोदींना अरबी समुद्रातून लांबच्या हवाई रस्त्याने जावे लागले होते. यासंबंधी भारताने आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संस्थेकडे (आयसीओए) तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार 'आयसीओए'ने इस्लामाबादला पत्र पाठवत याबाबत माहिती मागवली आहे.