नवी दिल्ली - संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीचा निकाल लागला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांची ४६ व्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. तर भारतीय-अमेरिकी वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचे अभिनंदन केले आहे.
काय म्हणाले मोदी ?
'निवडणूकीतील नेत्रदीपक विजयाबद्दल जो बायडेन तुमचे अभिनंदन. उपराष्ट्राध्यक्षपदी असताना भारत-अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यासाठी तुम्ही केलेले काम अत्यंत महत्त्वाचे आणि अमूल्य होते. भारत अमेरिका संबंध आणखी नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा तुमच्यासोबत काम करण्याची अपेक्षा व्यक्त करतो, असे ट्विट मोदींनी केले आहे.
कमला हॅरिस यांचेही अभिनंदन
कमला हॅरिस तुमचा निवडणुकीतील विजय अभूतपूर्व असा आहे. हा विजय फक्त तुमच्या 'वहिनी'साठीच अभिमानाचा नाही तर संपूर्ण भारतीय अमरिकेच्या लोकांसाठी अभिमानाचा आहे. तुमचे सहकार्य आणि नेतृत्त्वात भारत-अमेरिका संबंध आणखी मजबूत होतील, असा विश्वास व्यक्त करतो, असे ट्विट मोदींनी केले आहे.
मोदींनी ट्विटमध्ये वापरलेला 'चित्ती' शब्द काय आहे?
उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळाल्यानंतर कमला हॅरिस यांनी एका भाषणात 'चित्ती' हा तमिळ शब्द उच्चारला होता. कुटुंबाची माहिती देत असतना त्या म्हणाल्या होत्या, जर माझा निवडणुकीत विजय झाला तर माझ्या कुटुंबीयांसह चित्तीलाही आनंद होईल. तमिळमध्ये चित्ती म्हणजे वहीनी असा अर्थ होतो. माझ्या वहिनीलाही आनंद होईल, असे त्या म्हणाल्या होत्या. हॅरिस यांच्या भाषणानंतर चित्ती शब्द सोशल मीडियावर चांगलाच गाजला होतो. अमेरिकीतील स्थानिक माध्यमांनी याच्या बातम्या दिल्या होत्या. विशेषत: तामिळी नागरिकांनी कमला हॅरिस यांची स्तुती केली होती. आज विजयानंतर मोदींनीही चित्ती शब्दाची त्यांना आठवण करून दिली.