महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

फ्रान्समधील हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून निषेध, म्हणाले...

पंतप्रधान मोदींनी फ्रान्समधील दहशतवादी हल्ल्यांचा आज (गुरुवार) निषेध केला. दहशतवादाविरोधातील लढ्यात आम्ही फ्रान्सबरोबर उभे आहोत, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.

terrorist attack in France
पंतप्रधान मोदी

By

Published : Oct 29, 2020, 9:13 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी फ्रान्समधील दहशतवादी हल्ल्यांचा आज (गुरुवार) निषेध केला. आज(गुरुवार) नीस शहरात एका चर्चजवळ चाकू हल्ल्याची घटना घडली. याचाही मोदींनी निषेध केला. हल्ल्यातील पीडित नागरिक आणि फ्रान्सच्या जनतेसोबत आमच्या भावना आहेत. दहशतवादाविरोधातील लढ्यात आम्ही फ्रान्सबरोबर उभे आहोत, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.

चाकू हल्ल्याची घटना

फ्रान्समध्ये चाकू हल्ल्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. देशाच्या दक्षिण भागातील नीस शहरात एका चर्चजवळ ही घटना घडली. फ्रान्समधील शिक्षकाचा शिरच्छेद केल्यानंतर संपूर्ण फ्रान्समध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर आज (गुरुवार) पुन्हा चाकूहल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यामागे कट्टरतावादी किंवा दहशतवादी आहेत का? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. याआधी व्यंगचित्र प्रदर्शित केल्यामुळे २०१५ साली शार्ली हेब्दो या मासिकाच्या कार्यालयावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात १५ जणांचा मृत्यू झाला होता. मुस्लिम कट्टरतावाद्यांकडून याआधीही फ्रान्समध्ये हल्ले झाले आहेत.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्रानंतर वाद

फ्रान्समधील एका शिक्षकाने वर्गात शिकवत असताना प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र दाखविले होते. त्यानंतर मुस्लिम कट्टरतावाद्याने या शिक्षकाचा भररस्त्यात शिरच्छेद केला. या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅकरॉन यांनी या घटनेचा कठोर शब्दात निषेध केला. मुस्लिम धर्माबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. अनेक देशांनी फ्रेंच मालावर बहिष्कार घालण्याची हाक दिली. पाकिस्तान, बांगलादेश, कतार या देशांसह अनेक देशांत आंदोलने झाले. शिक्षकाच्या हत्येनंतर फ्रान्स पोलिसांनी देशातील कट्टरतावाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शंभरपेक्षा जास्त ठिकाणांवर छापे मारले.

ABOUT THE AUTHOR

...view details