कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या श्रीरामपूर येथे जनसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला. निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) अनेक नेते पक्ष सोडणार असल्याचे सांगत, त्यातील ४० नेते आपल्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावाही मोदी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर तृणमूल काँग्रेसनेही त्यांना प्रत्युत्तर दिले.
निवडणुकीनंतर देशभरात कमळ फुलणार आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसचे नेते पक्ष सोडतील. एवढेच नाही, तर त्यापैकी ४० नेते आपल्या संपर्कात आहेत. त्यामुळे दीदी (ममता बॅनर्जी) यांना नक्कीच धक्का बसेल, असा दावा मोदींनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर टीएमसी नेते डेरेक-ओ-ब्रायन यांनी तत्काळ उत्तरही देऊन टाकले.
मोदी यांच्यासोबत टीएमसीचा एकही नेता जाणार नाही. साधा नगरसेवकही त्यांच्यासोबत जाणार नाही, असे ट्विट करुन ब्रायन यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. मोदी हे निवडणूक प्रचार करायला येतात की घोड्याची बोली लावण्यासाठी येतात? असा सावालही त्यांनी ट्विटवरून उचलला आहे. आपण मोदी यांच्या विरोधात ते घोड्यांचा व्यापार करात म्हणून तक्रार दाखल करणार आहोत, असेही ब्रायन यांनी ट्विटरमध्ये म्हटले आहे.
दीदी तुमचे वाचणे यावेळी कठीण होणार आहे. तुम्ही याची खात्री करुन घ्या, असेही मोदी यांनी वरील वक्तव्य करताना म्हटले आहे. ममता बॅनर्जी म्हणतात आपल्याला त्या मातीचा रसगुल्ला करुन खाऊ घालणार. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद आणि नेताजी सुभाष चंद्र बोस या राज्याला लाभले आहेत. दीदींचा तो सरगुल्ला माझ्यासाठी प्रसाद असेल, असा पलटवारही मोदी यांनी यावेळी केला.