नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड लस विकसित करण्यात सहभागी असलेल्या जेनोवा बायोफर्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डीज यांच्याशी संवाद साधला. नियामक प्रक्रिया आणि संबंधित बाबींबाबतच्या सूचना आणि कल्पना कंपन्यांनी आपल्यासमोर मांडाव्यात असे पंतप्रधानांनी सांगितले. लस आणि तीची उपयुक्तता, वाहतूक, शीतसाखळी अशा संबंधित विषयांबाबत सर्वसामान्य लोकांना सोप्या भाषेत माहिती देण्यासाठी जास्त प्रयत्न करावेत, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली. पंतप्रधानांनी थेट संवाद साधल्यामुळे वैज्ञानिकांचे मनोबल उंचावले.
900 कोटी रूपयांचे कोविड सुरक्षा प्रोत्साहन पॅकेज -
स्वदेशी लस विकसनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने 900 कोटी रूपयांचे मिशन कोविड सुरक्षा (कोविड सुरक्षा मोहिम) पॅकेज जाहीर केले आहे. कोविड–19 लस विकसन मोहिमेंतर्गत लसीचे वैद्यकीय विकसन, उत्पादन तसेच लस वापरासाठी नियामक सुविधांची पूर्तता लवकरात लवकर करण्यासाठी सर्व उपलब्ध आणि अनुदानीत स्रोतांचे एकत्रिकरण केले जाईल. सुसंवादासाठी समान नियम, प्रशिक्षण, माहिती व्यवस्थापन यंत्रणा, नियामक बाबींची पूर्तता, अंतर्गत तसेच बाह्य गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली आणि अधिमान्यता प्राप्त करणे हे सुद्धा या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.