नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी तिथे भाषण केले. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या वार्षिक सभेमध्ये ते बोलत होते.
या परिषदेच्या वार्षिक उच्चस्तरीय सभेमध्ये जगभरातील विविध प्रतिनिधी उपस्थित असतात. यात वेगवेगळ्या देशांचे सरकारी प्रतिनिधी, खासगी क्षेत्रातील प्रतिनिधी, तसेच नागरी समाज आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश असतो. यावर्षीच्या या सभेचा विषय आहे - 'कोरोना काळानंतरची बहुपक्षीयता : संयुक्त राष्ट्रांच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आपण काय अपेक्षा ठेवतो.'
आज इकोसॉकच्या या सभेला १९३ देश एकत्र आले आहेत. या संस्थेकडून जगभरातील लोकांच्या अपेक्षा सध्या वाढल्या आहेत. भारताने नेहमीच इकोसॉकच्या विकासकामांना पाठिंबा दिला आहे. इकोसॉकचे पहिले अध्यक्ष देखील भारतीयच होते. आम्ही सध्या प्रत्येक विकसनशील देशाला त्यांचे लक्ष्य गाठण्यासाठी मदत करत आहोत, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
"सबका साथ सबका विकास" हे आमचे बोधवाक्य आहे. म्हणजेच, सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांची प्रगती! आम्ही कोणालाही मागे ठेवत नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊन, सगळ्यांना प्रगतीपथावर नेतो. २०२२ मध्ये, जेव्हा स्वतंत्र भारताचा ७५वा वर्धापन दिन असेल, तेव्हा देशातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर एक सुरक्षित छत असेल, असेही ते म्हणाले.
दुसऱ्या महायुध्दाच्या झळांमधून संयुक्त राष्ट्रसंघाचा जन्म झाला होता; आज कोरोना महामारीच्या झळांमधून याचे पुनरुज्जीवन करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. आपण ही संधी गमावता कामा नये. जागतिक समरसता टिकवून ठेवण्यासाठी, सामाजिक-आर्थिक समता सुधारण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल टिकवून ठेवण्याच्या आपल्या गहन प्रतिबद्धतेसह, भारत संयुक्त राष्ट्रांच्या अजेंडाच्या पूर्ण समर्थनासाठी आपली भूमिका बजावेल, असे मत मोदींनी यावेळी व्यक्त केले.
कोरोना महामारी, आणि बदलते आंतरराष्ट्रीय वातावरण या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या सभेत; बहुपक्षीयतेला आकार देण्याबाबत, त्याचा मार्ग ठरवण्याबाबत चर्चा होईल. तसेच मजबूत नेतृत्व, परिणामकारक आंतरराष्ट्रीय संस्था, सहभागाचा विस्तार आणि जागतिक सार्वजनिक मालमत्तेचे महत्त्व यासाठी जागतिक अजेंडा कसा राबवता येईल याबाबत चर्चा होणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ स्थापनेच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त इकोसॉकच्या उच्च-स्तरीय सभेची थीम, भारताच्या सुरक्षा परिषदेच्या प्राथमिकतेशी अनुरुप आहे; ज्यात भारताने कोविड -१९ नंतरच्या जगात सुधारित बहुपक्षीयतेची मागणी केली आहे.