नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी मोदींनी स्वामी विवेकानंद 'अमर रहे'च्या घोषणाही दिल्या. मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. तसेच जेएनयूचे विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासनाला शुभेच्छा दिल्या.
स्वामीजी सर्वांना प्रेरणा देत राहतील
पंतप्रधान मोदी म्हणाले की, विद्यापीठातील स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा सर्वांना प्रेरणा, उर्जा देत राहील. ही प्रतिमा प्रत्येक व्यक्तीला धैर्य आणि आत्मविश्वास देवो, जे स्वामी विवेकानंद प्रत्येक व्यक्तीत यावे अशी अपेक्षा व्यक्त करत होते. करुणा, दया हा स्वामीजींच्या प्रतिमेचा मुख्य पाया आहे, हे गुण सर्वांमध्ये असावेत. स्वामी विवेकानंदांची मूर्ती देशाप्रती समर्पण, प्रेम शिकवेल, जो स्वामीजींच्या जीवनाचा सर्वोच्च संदेश आहे, असे मोदी म्हणाले. विद्यार्थ्यांनी विनोदबुद्धी जिवंत ठेवावी, कोणत्याही दबाबाखाली न राहता हसत खेळत जगावे, असेही मोदी म्हणाले.
सशक्त, समृद्ध भारताचे स्वप्न साकार करण्यास स्वामीजींचे बळ
तरुणांना घेवून देशाचा विकास करण्यास ही प्रतिमा सर्वांना प्रेरणा देत राहील, स्वामीजींची हीच अपेक्षा होती. सशक्त, समृद्ध भारताचे स्वप्न साकार करण्यास स्वामी विवेकानंदांची ही प्रतिमा बळ देत राहील. ही फक्त एक प्रतिमा नाही तर एका संन्यासीने संपूर्ण जगाला भारताची ओळख करून दिली, त्याचे प्रतिक आहे. त्यांच्याकडे वेदांचे अफाट ज्ञान होते, दुरदृष्टी होती. त्यांना माहित होतं भारत जगाला काय देऊ शकतो. भारताच्या विश्व बंधुता संदेशाला घेवून ते जगात केले. भारतीय परंपरांना त्यांनी आदराने जगासमोर ठेवले.