नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी आज(मंगळवार) देशवासीयांच्या नावे संदेश जारी केला. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले. दसरा, दिवाळी सण असल्याने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी मोठी घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मोदींनी कोणतीही मोठी घोषणा केली नाही, किंवा भारत चीन वादावर वक्तव्य केले नाही. लॉकडाऊन गेले असले तरी कोरोना गेला नाही, असे म्हणत 'जब तक दवाई नही तब तक कोई ढिलाई नही', असे मोदी म्हणाले.
लॉकडाऊन गेले असले तरी कोरोना गेला नाही.
सणासुदीच्या काळात बाजार खुलले आहेत. लॉकडाऊन संपले असेल तरी कोरोना संपला नाही. जोपर्यंत औषध नाही तोपर्यंत हलगर्जीपणा नाही. मागील सात-आठ महिन्यांच्या प्रयत्नानंतर भारताची कोविड स्थिती स्थिर आहे. आपण परिस्थिती आणखी खराब होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी.
अनेक नागरिकांना आता काळजी घेणे बंद केले आहे. हे योग्य नाही. जर तुम्ही हलगर्जीपणा करत असाल. विना मास्क घराबाहेर निघत असाल, तर तुम्ही स्वत:ला कुटुंबाला आणि वयोवृद्ध नागरिकांना संकटात टाकत आहात, असे मोदी म्हणाले.
प्रगत देशांपेक्षा नागरिकांचे जीव वाचविण्यात भारत पुढे
देशात रुग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे. जगातील प्रगत देशांच्या तुलनेत भारतातील नागरिकांचे जीव वाचविण्यात आपण यशस्वी होत आहोत. कोरोनाचा प्रसार होत असताना मोठ्या प्रमाणात चाचण्या ही आपली मोठी ताकद आहे. सेवा परमो धर्म: या मंत्रानुसार आपले डॉक्टर, नर्स लोकांची निस्वार्थ सेवा करत आहेत. हे सर्व प्रयत्न सुरू असताना निष्काळजीपणा करण्याची वेळ नाही. कोरोना गेला असे समजण्याची वेळ नाही.
जगभरात कोरोना लस तयार करण्यासाठी काम सुरू
जगभरात कोरोना लस तयार करण्यासाठी काम सुरू आहे. काही देश पुढे आहेत. कोरोनाची लस प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल यावर काम सुरू आहे. सोशल मीडियावरील नागरिकांनी कोरोनाबाबत जनजागृती करावी, असे मोदी म्हणाले. मोदींनी शेवटी देशवासीयांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.