दिसपूर - प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि पुनर्वापर करण्याच्या नवनवीन संकल्पनांचा शोध सातत्याने सुरू आहे. यासाठी आसामच्या माजूली जिल्ह्यातील एक अंगणवाडी, सर्वांनाच रस्ता दाखवणारी आहे. माजुली जिल्ह्याचे उपायुक्त विक्रम कैरी यांनी सुरू केलेल्या 'किशालया' या प्रकल्पाअंतर्गत, जिल्ह्यातील १०० अंगणवाडी केंद्राच्या इमारती या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून उभारण्यात येणार आहेत.
हेही वाचा - शिक्षकाने गाण्यातून दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
अशा प्रकारे तयार केली जाणाऱ्या पहिल्या अंगणवाडीचा एकूण खर्च सुमारे ८० हजार रूपये असणार आहे. सिलाकला गाव पंचायतीमध्ये येणाऱ्या काकोरीकोटा पाबना गावामध्ये ही अंगणवाडी बांधण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठे नदीमधील बेट असलेल्या या ठिकाणातील अंगणवाडीसाठीचा कोनाशीला समारंभ २५ डिसेंबर २०१९ला पार पडला होता. किशालया प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ४५ अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये ब्रह्मपुत्रेच्या बेटावरील स्थानिकही मोलाचे योगदान करत आहेत.