एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस जवानांना हरियाणातील पिझ्झा स्टोअरनं दिले ५ लाखांचे बक्षीस - पिझ्झा स्टोअर बक्षीस बातमी
हरियाणा राज्यातील रोहतकमधील एका पिझ्झा स्टोअरने एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना ५ लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
![एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस जवानांना हरियाणातील पिझ्झा स्टोअरनं दिले ५ लाखांचे बक्षीस pizza store rohatak](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5293443-390-5293443-1575648688157.jpg)
बक्षीसाचा चेक दाखवताना पिझ्झा स्टोअरमधील कर्मचारी
चंदीगड - पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या ४ आरोपींचा एन्काऊंटर केल्यानंतर देशभरातून पोलिसांचा जयजयकार केला जात आहे. अनेकांनी पोलिसांच्या या कारवाईचे समर्थन केले आहे. महिलांनी फटाके फोडून या एन्काऊंटरचे स्वागत केले. या एन्काऊंटरचे स्वागत करत हरियाणातील एका पिझ्झा स्टोअरने पोलिसांना ५ लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. हे पिझ्झा स्टोअर रोहतकमधील असून त्यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे.
पिझ्झा स्टोअरने एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना ५ लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली
पोलिसांनी ज्या तत्परतेने आरोपींना शिक्षा दिली, त्यापासून आम्ही प्रेरणा घेतली. म्हणूनच पोलिसांना ५ लाख रुपये बक्षिस देण्याचा निर्णय आम्ही घेतला. या पुढेही पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी अशी कारवाई केली, तर आमची पिझ्झा कंपनी जवानांचा आत्मविश्वास वाढवत राहणार असल्याचे स्टोअरच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
आज(शुक्रवारी) सकाळी करण्यात आला एन्कांऊटर
हैदराबादमधील पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी तपास करण्यासाठी पोलीस आरोपींना आज पहाटे घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावेळी आरोपींनी दगड आणि तीक्ष्ण वस्तूंनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांच्या दोन बंदुकाही आरोपींनी हिसकावून घेतल्या. तसेच गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चारही आरोपींचा मृत्यू झाला. २७ नोव्हेंबच्या रात्री आरोपींनी महिलेवर बलात्कार केला होता तसेच महिलेला जाळले होते.