नवी दिल्ली- रेल्वे मागे धावून चार महिन्यांच्या मुलाला दूध पॅकेट देणाऱ्या आरपीएफ जवानाचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी कौतूक केले आहे. ही घटना भोपाळ रेल्वेस्थानकावर घडली होती. या आरपीएफ जवानाला रोख बक्षीसही रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
रेल्वे संरक्षण दलाचे जवान इंदर सिंह यादव (33) यांनी कर्तव्यावर असताना अनुकरणीय काम केल्याचे रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे.
अशी घडली होती घटना
शरीफ हाश्मी ही महिला पतीसमवेत चार महिन्यांच्या मुलाला घेऊन श्रमिक रेल्वेमधून बेळगाववरून गोरखपूरला जात होती.
मागील रेल्वेस्थानकावर दूध मिळू शकले नसल्यामुळे ते चार महिन्यांचे मूल रडत होते. त्या महिलेने जवानाला मदत करण्याची विनंती केली.
यादव यांनी तातडीने भोपाळ रेल्वे स्थानकावर असलेल्या दुकानातून दुधाचे पाकीट घेतले. मात्र त्यावेळेस रेल्वे सुरू झाली होती. जवानाने माणुसकी आणि धाडस दाखवून रेल्वेच्या मागे धावण्यास सुरुवात केली. त्यावेळी धाडसी जवानाने रेल्वेत बसलेल्या महिलेकडे दुधाचे पाकीट दिले. ही सर्व घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.