नवी दिल्ली - गुलाबी शहर म्हणून ओळख असलेले राजस्थानमधील ऐतिहासिक शहर जयपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. युनेस्कोने वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या जयपूर शहराचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला आहे.
युनेस्कोने ट्विट करत जयपूरचा जागतिक वारसा स्थळात समावेश केल्याची माहिती दिली. बाकू (अझरबैझान) येथे ३० जून ते १० जुलैपर्यंत चालू असलेल्या जागतिक वारसा हक्क समितीच्या बैठकीत जयपूरसोबत जगातील अनेक इतर ऐतिहासिक स्थळांचा जागतिक वारसा स्थळात समावेश करण्यात आला आहे. जयपूर शहराची स्थापना सवाई जय सिंह दुसरा यांनी केली होती. सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेले जयपूर शहर राजस्थानची राजधानी आहे.