नवी दिल्ली - राजस्थानमध्ये सुरू झालेल्या सत्ता संघर्षात आता नवीन वळण प्राप्त झाले आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आता मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. आमदार खरेदी प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन दलाच्या नोटीसनंतर गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद अधिकच ताणला गेला होता. त्यानंतर पायलट यांनी दिल्लीत ठाण मांडले आहे. त्यानंतर ते भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे म्हटले आहे, असे असले तरी ते भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिंया यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्लीमध्ये पूर्वीचे काँग्रेस नेते आणि त्यांचे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया आणि पायलट यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. मात्र, त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबतची माहिती समोर आली नाही. दोन्ही नेत्यांनी यापूर्वी काँग्रेसमध्ये अनेकवर्ष एकत्र काम केलेले आहे. तसेच त्या दोघांचा आजही नियमित फोनवरून संपर्क सुरू असतो. त्यानंतर रविवारी सिंधिंया यांनी पायलट यांचे समर्थन करत काँग्रेसमध्ये त्यांची कुंचबना होत असल्याचे ट्विट केले होते.
पायलट सध्या गेहलोत यांच्यावर नाराज आहेत. पायलट आणि त्याच्या समर्थकांना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून वारंवार अपमानित व्हावे लागले, तसेच पायलट यांच्या अनेक समर्थकांच्या मागे सीआयडीचा ससेमीरा लावला, आणि त्यांचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयास दिला जात होता, असा आरोप पायलट यांच्या समर्थकांनी केला आहे.