देहराडून- सध्या समाजमाध्यमांमध्ये कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पातील एक छायाचित्र भरपूर व्हायरल होत आहे. यामध्ये या प्रकल्पाच्या ढिकाला झोनमध्ये असणारे तीन वाघ, हे चक्क प्लास्टिक खाताना दिसून येत आहेत. हे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर कॉर्बेट प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पातील वाघ खातायत चक्क प्लास्टिक! या प्रकल्पाच्या ढिकाला भागामधून रामगंगा नदी जाते. या नदीकिनारी वाघ पाणी पिण्यासाठी येत असतात. व्हायरल होत असलेल्या छायाचित्रामध्ये याच नदीकिनारी, तीन वाघ दिसून येत आहेत. यामधील दोन वाघ हे नदीकिनारी पडलेली, निळ्या रंगाची एक प्लास्टिकची बादली खाताना दिसत आहेत.
याबाबत विचारणा केली असता, व्याघ्र प्रकल्पाचे निर्वाहक राहुल कुमार यांनी सांगितले, की प्रकल्पामध्ये पूर्णपणे प्लास्टिबंदी लागू करण्यात आली आहे. जंगलात कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक नसेल, याची वेळोवेळी तपासणीही होत असते. व्हायरल होत असणारे छायाचित्र कदाचित ३० जानेवारीचे असावे, त्याआधी भरपूर पाऊस पडला होता. त्यामुळेच, कदाचित नदीच्या पाण्यामधून वाहत हे प्लास्टिक जंगलात पोहोचले असावे. जे वाघ फोटोमध्ये प्लास्टिक खाताना दिसत आहेत, त्यांना शोधून, त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या दोनही वाघांची प्रकृती स्थिर आहे.
हेही वाचा : केरळमध्ये स्वयंपाकघरातील नळातून पाण्याऐवजी आली चक्क दारू