नवी दिल्ली -आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झालेली नसतानाही भारतात सलग अकराव्या दिवशी इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज (बुधवार) पेट्रोलच्या दरात दिल्लीत ५५ पैशांची तर डिझेलच्या दरात ६९ पैशांची वाढ करण्यात आली.
मागील ११ दिवसात पेट्रोलच्या दरात ६.२ रुपयाने तर डिझेलच्या दरात ६.४ रुपयांनी वाढ झाली आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर ७७.२८ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७५.७९ रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. मंगळवारी पेट्रोलच्या दरात ४७ पैसे तर डिझेलच्या दरात ५७ पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा पेट्रोल डिझेलची दरवाढ करण्यात आली आहे.
आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८४.१५ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७४.३२ रुपये, चेन्नईत पेट्रोलचे दर ८०.८६ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७३.६९ रुपये प्रति लिटर आणि कोलकात्यात पेट्रोलचे दर ७९.०८ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७१.३८ रुपये प्रति लिटर झाले आहेत. बंगळुरूत पेट्रोल ७९.७९ तर डिझेल ७२.०७ रुपये प्रति लिटर झाले आहे.