नवी दिल्ली - शाहीन बागेमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब फेकत हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत कुठलीही हानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
शाहीन बागेतील आंदोलनकर्त्यांवर पेट्रॉल बॉम्बने हल्ला आज सकाळी 9.30 च्या सुमारास आंदोलनस्थळी दुचाकीवरील अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. त्यानंतर पोलिसांनी तपासणी केल्यानंतर आंदोलन स्थळी 4 ते 5 पेट्रोल बॉम्ब आढळले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत असून फॉरेन्सिक टीमनेदेखील घटनास्थळाची तपासणी केली आहे.
देशामध्ये कोरोनाचा प्रभाव पाहता शाहीन बागेतील आंदोलकांना हटवण्यासाठी एक नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकांवर 23 मार्चला म्हणजेच येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
दरम्यान शाहीन बाग परिसरात दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून धरणे आंदोलन सुरू आहे. विवादित नारगरिकत्व सुधारणा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलक महिला करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी ३ मध्यस्थांची नियुक्ती केली आहे. आंदोलकांना पर्यायी मार्ग देण्याचा पर्याय समोर ठेवण्यात आला होता. मात्र, शाहीन बाग परिसरात आंदोलन करण्यावर आंदोलक ठाम आहेत. अद्यापही यावर तोडगा निघाला नाही.