लखनऊ - उत्तर प्रदेशातील अन्न प्रक्रिया उद्योगाच्या क्षेत्रातील विकासाची गती वाढू शकते. पेप्सिकोने मथुरेत बटाटा चिप्सच्या उत्पादनासाठी 814 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील कोसी भागात ही युनिट उभारले जातील आणि 2021 सालाच्या मध्यापर्यंत याचे व्यावसायिक उत्पादन सुरू होईल.
मथुरा जिल्ह्यातील कोसी भागात 35 एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. उत्तर प्रदेश राज्य औद्योगिक विकास प्राधिकरणाने (यूपीएसआयडीए) ही जमीन उपलब्ध करून दिली आहे.
कंपनीद्वारे बटाटे आणि लागणारा इतर कच्चा माल स्थानिक माध्यमांकडून मिळवला जाईल. याचा स्थानिक शेतकऱ्यांना उपयोग होईल. हा प्रकल्प पूर्ण तयार झाल्यानंतर याच्या माध्यमातून अंदाजे 1,500 लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात रोजगार मिळेल.
उत्तर प्रदेशचे औद्योगिक विकास मंत्री सतीश महाना म्हणाले की, हा प्रकल्प मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांचे फलित आहे.
हेही वाचा -'उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था मृतावस्थेत'
'काही धोरणे राबवून सरकारने व्यवसाय करणे सुलभ केले आहे. त्या दृष्टीने व्यापारी सुधारणांची तरतूद केली असून उत्तर प्रदेशला गुंतवणुकीसाठी अत्यंत आकर्षक राज्य बनवले आहे. परिणामी, पेप्सिकोसारख्या अनेक कंपन्यांनी राज्य सरकारवर विश्वास दर्शवत राज्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. ते येथील व्यावसायिक वातावरणाविषयी आशावादी आहेत,' असे ते पुढे म्हणाले.
'प्रारंभी या प्रकल्पात 500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना आखण्यात आली होती. त्यासाठी कंपनीने 2018 मधील गुंतवणूकदार परिषदेदरम्यान उत्तर प्रदेश सरकारबरोबर सामंजस्य करार केला आहे. आता या गुंतवणूक योजनेत सुधारणा करून ती 814 कोटी रुपयांची केली आहे,' असे पेप्सिको इंडियाचे अध्यक्ष अहमद अल शेख म्हणाले.
पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास आयुक्त आलोक टंडन म्हणाले की, जुलै 2019 मध्ये झालेल्या भूमिपूजन सोहळ्यापासून या प्रकल्पाची सुरूवात झाली. 'उत्तर प्रदेशात पारदर्शक गुंतवणूक यंत्रणा स्थापन होत असल्याने सरकारने सामंजस्य करार, जमीन वाटप आणि कामगार संबंधित सुधारणांचा व्यापक अभ्यास सुरू केला आहे,' असे ते म्हणाले.
1990 पासून, उत्तर प्रदेशात पेप्सिको फ्रेंचायझीद्वारे कार्बोनेटेड थंड पेये आणि कार्बनयुक्त नसलेली पेये तयार केली जात आहेत.
ही युनिट ग्रेटर नोएडा, कोसी, सथरिया-जौनपूर, कानपूर देहात आणि हरदोई येथे आहेत. उत्तर प्रदेशात ग्रीनफील्ड प्रकल्प उभारण्याची कंपनीची ही पहिलीच वेळ आहे.
हेही वाचा -उत्तर प्रदेश : तीन मानवी तस्करांना अटक, दोन महिलांची सुटका