पाटणा- बिहार निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील ७१ जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी नागरिकांनी आता बिहारच्या विकासात्मक बदलांसाठी मतदान करावे, असे आवाहन केले आहे.
गेल्या १५ वर्षात युवकांना बेरोजगार ठेवण्याचे काम-
तेजस्वी यादव म्हणाले, निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना मला असे सांगावे वाटते की आता त्यांनी बिहारच्या बदलांसाठी मतदान करायला हवे. गेल्या पंधरा वर्षापासून सरकारने युवकांना बेरोजगार ठेवले. शेतकरी आणि मजुरांची स्थिती दयनीय केली आहे. राज्यात उद्योगाचा विकास करण्यास ते सक्षम नव्हते. राज्यातील गरिबी दूर झाली नाही आणि राज्यातील शिक्षण व आरोग्याचा बोजवारा उडाला असल्याचेही पुढे त्यांनी म्हटले आहे.
या निवडणुकीत सर्वात महत्वाचा मुद्दा हा बेरोजगारी आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नुकतेच बिहारच्या पूरग्रस्तांकडेही दुर्लक्ष केले. तसेच राज्यातील अन्य समस्यांकडेही त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पहिल्यांदा मी जनतेला आवाहन करतो की आता त्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करावे.