नवी दिल्ली -केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत टीका करणाऱ्या विरोधकांची अक्षरश: बोलती बंद केली आहे. विमानतळ आणि रेल्वे स्थानकावरील गर्दी कायम आहे. शिवाय लोकांची लग्नंही धूमधडाक्यात होत आहेत. देशाची अर्थव्यवस्था सुरळीत असण्याची ही लक्षणे असल्याचे अजब विधान त्यांनी केले आहे.
दर तीन वर्षांनी देशामध्ये मंदी येतेच, मात्र काही काळातच अर्थव्यवस्था पुन्हा तेजीत जाते. ही एक नियमित चालणारी प्रक्रिया आहे. मात्र, ही गोष्ट लक्षात न घेता काही लोक या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीकाही सुरेश यांनी यावेळी केली.
हेही वाचा :मंदीचे ग्रहण सुटेना! औद्योगिक उत्पादनाच्या दरात ४.३ टक्के घसरण
याआधीही, केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी चित्रपट कोट्यवधींचा गल्ला गोळा करत आहेत, तर मंदी कुठे आहे? असे वक्तव्य केले होते. त्यावरून सोशल मीडियामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते.
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष, अर्थव्यवस्थेतील मंदीवरून सरकारवर बऱ्याच काळापासून टीका करत आहेत. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्याचाही विचार विरोधी पक्ष करत आहेत.
दरम्यान, यावर्षी अर्थशास्त्राचे नोबेल मिळालेले भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनीही भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी चिंता व्यक्त केली होती. तर, सध्याच्या आकडेवारीनुसार देशाची अर्थव्यवस्था लवकर रुळावर येईल, असे वाटत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. दुसरीकडे, पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी अर्थव्यवस्था मंदावल्याचे कारण चक्राकार नसून, संरचनात्मक बदल असल्याचे म्हटले होते.
हेही वाचा :मंदी म्हणजे काय? जाणून घ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती