नवी दिल्ली - सुधारित नागरिकत्व कायद्यावरून दिल्लीमध्ये पेटलेल्या हिंसाचारावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच मत व्यक्त केले आहे. ट्विटरवरून त्यांनी देशवासियांना संदेश दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असतानाच ईशान्य दिल्लीमध्ये दोन समुहांमध्ये हिंसाचार पसरला. त्यामुळे ट्रम्प यांचा दौरा ही दिल्लीत घडलेल्या घटनांनी झोकाळून गेला आहे.
"शांतता आणि एकोपा आपल्या संस्कृतीचा मूळ गाभा आहे. दिल्लीकरांनी शांतता बाळगावी. लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी हे सर्वांसाठीच गरजेचे आहे. मी दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा आहे. सुरक्षा दले शांतता प्रस्थापित होण्यासाठी लोकांमध्ये जाऊन काम करत आहेत", असा संदेश पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून दिला आहे.
ईशान्य दिल्लीमध्ये उसळलेल्या हिंसाचारामध्ये आत्तापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. अनेक संवेदनशील ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
राजधानी दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट असून दिल्लीत उद्भवलेल्या स्थितीला गृहमंत्री अमित शाह जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. दिल्लीत कायदा सुव्यवस्था राखण्यास मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही अयशस्वी ठरले आहेत, असे म्हणत त्यांनी केजरीवालांनाही लक्ष्य केले. भाजपचे नेते द्वेष पसरवत असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले आहे.