हरिद्वार : कोरोनावरील औषध म्हणून बाजारात आणलेल्या 'कोरोनील'बाबत पतंजलीने आता घूमजाव केले आहे. हे औषध कोरोनावरील नसून, केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आहे, असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.
पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, आम्ही कोरोनावर औषध शोधल्याचा दावा कधीही केला नव्हता. आमच्या कंपनीने रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध बनवण्यासाठी परवाना घेतला होता. दिव्य स्वासरी वटी, दिव्य कोरोनील टॅबलेट आणि दिव्य अणु तेल ही सर्व केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी असलेली औषधे आहेत. ते पुढे म्हणाले, की या औषधावरुन सुरू असलेला सर्व गदारोळ हा केवळ माझी बदनामी करण्यासाठी सुरू आहे. आम्ही या औषधाच्या चाचण्या पुन्हा करण्यासाठी तयार आहोत. एनआयएमएस विद्यापीठाने या औषधाची चाचणी करताना कोणत्याही नियमांचा भंग केला नाही. तसेच आम्हीही कोणताही खोटा दावा केला नाही.