हैदराबाद : जगभरातील लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोना आजारावर औषध मिळाल्याचा दावा अनेक कंपन्या करत आहेत. ग्लेन फार्मा, हेटेरो लॅब्स, सिप्ला या कंपन्यांनंतर आता 'पतंजली आयुर्वेद'नेही कोरोनावरील औषध बाजारात उपलब्ध केले आहे. पतंजलीच्या या औषधाचे नाव 'दिव्य कोरोनील' असे आहे. पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी संयुक्तपणे या औषधाची निर्मिती केली आहे. या औषधाची वैद्यकीय चाचणी शेवटच्या टप्प्यात असल्याचेही पतंजलीने स्पष्ट केले आहे. सध्या याचे उत्पादन हरिद्वारमधील दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद या दोन्ही कंपन्या मिळून करत आहेत.
जयपूर, इंदूरमधील वैद्यकीय चाचण्या १००टक्के यशस्वी..
या औषधाच्या जयपूर आणि इंदूरमध्ये झालेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये १००टक्के यश मिळाल्याचे पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बालाकृष्णा यांनी म्हटले आहे. कोरोनीलच्या वापराने कोरोनाचा रुग्ण साधारणपणे ५ ते १४ दिवसांमध्ये बरा होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केवळ ५४५ रुपयांमध्ये उपलब्ध..
कोरोनीलचे किट हे केवळ ५४५ रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. एका किटचा वापर ३० दिवसांसाठी करता येतो. येत्या आठवड्याभरात हे किट सर्व पतंजली दुकानांमध्ये उपलब्ध करुन देण्याचा कंपनीचा मानस आहे. या किटच्या होम डिलिव्हरीसाठी कंपनी एक अॅपही लाँच करणार आहे.