नवी दिल्ली - मोठ्या थाटामाटात आज लॉंच करण्यात आलेले पतंजलीचे कोरोनावरील औषध वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कंपनीने या औषधामुळे कोरोनाचा रुग्ण साधारणपणे ५ ते १४ दिवसांमध्ये बरा होऊ शकतो असा दावा केला होता. मात्र, आयुष मंत्रालयाने याबाबात पुरावे मागितले असून, यासंदर्भात केल्या गेलेल्या संशोधनाचे अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश पतंजलीला देण्यात आले आहेत.
'आयुष'ने जारी केलेल्या एका सूचनेनुसार, मंत्रालयाने पतंजलीच्या या दाव्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळेच, आयुषने कंपनीला या औषधामध्ये वापरण्यात आलेल्या घटकांची महिती मागवली आहे. तसेच, यावेळी कंपनीकडून करण्यात आलेल्या संशोधनाचीही संपूर्ण माहिती मंत्रालयाकडे सादर करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत.
कंपनीला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, की अशा प्रकारचे दावे करणे हे ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहीराती) कायदा, १९५४; आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसार बेकायदेशीर आहे. त्यामुळे याबाबत केलेल्या संशोधनाची माहिती, आणि चाचण्यांचा अहवाल सादर करण्याचा आदेश कंपनीला देण्यात आला आहे.