बेरीनाग (उत्तराखंड) -पुराणकाळातील गुहांची नावं समोर येताच त्यांच्या रहस्यांबद्दल जाणून घेण्याची इच्छा होते.कित्येक गुहा स्वत:च्या पोटात विविध रहस्य दडवून आहेत. अशाच प्रकारची एक गुहापिथोरागडच्या गंगोलीहाट तालुक्यात आहे. भगवान शंकराने धडापासून वेगळे केलेले गणेशाचे मस्तक याच ठिकाणी येऊन पडल्याची आख्यायिका आहे. याचा उल्लेख पुराणांमध्ये मिळतो.
गुहेतील आश्चर्य
समुद्रसपाटीपासून 1350 मीटर उंच असलेल्या पाताल भुवनेश्वराची गुहा प्रवेशद्वारापासून 160 मीटर लांब असून 90 फूट खोल आहे. या गुहेत केदारनाथ, बद्रीनाथ आणि अमरनाथाचे दर्शन होते. स्कन्दपुराणात पाताल भुवनेश्वराच्या गुहेचा उल्लेख आला आहे.
अख्यायिकांशी जोडणारा इतिहास
पाताळ भुवनेश्वराच्या गुहेत भगवान गणेशाचे मस्तक आहे. गणपतीच्या जन्माविषयी अनेक कहाण्या प्रचलित आहेत. भगवान शंकराने क्रोधित होऊन गणेशाचं मुंडकं उडवलं होतं. यानंतर पार्वतीच्या सांगण्यानुसार भगवान शंकराने गणपतीला हत्तीचे मस्तक लावले. या कथेदरम्यान उडवलेले मस्तक भगवान शंकराने पाताल भुवनेश्वराच्या गुहेत ठेवल्याचे म्हटले जाते. या लिंगरुपी गणेशाच्या वरती 108 पाकळ्यांचे दगडी ब्रह्मकमळ आहे. त्यामधून पींडिवर सतत पाण्याचे थेंब पडत असतात. या थेंबांची दिशा आदिगणेशाच्या तोंडावर पडताना दिसते. हे ब्रह्मकमळ भगवान शंकराने या ठिकाणी प्रस्थापित केल्याचे मानले जाते.
पुराणातील वर्णन
पुराणांमधील कथांनुसार या गुहेत भगवान शंकर स्वत: विराजमान होते. त्यांची उपासना करण्यासाठी अन्य देव या ठिकाणी पोहोचले होते. द्वापार युगात पांडवांनी या ठिकाणी जुगार खेळला होता. तर त्रेता युगातील राजा ऋतुपर्ण हरणाचा पाठलाग करताना या ठिकाणी पोहोचले होते. यावेळी राजाने भोलेनाथासह अन्य देवतांचेही दर्शन केले होते.
कलियुगात जगद्गुरू शंकराचार्यांनी इ.सन 722 च्या जवळपास या गुहेत साक्षात्कार झाला. यावेळी त्यांनी मंदिरातील शिवलिंगाला तांब्याने बंद केले. कारण या शिवलिंगात एवढे तेज होते, की कोणत्याही व्यक्तीने त्याला उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास त्याला अंधत्व येण्याची शक्यता होती. यानंतर अनेक राजांनी काही काळानंतर या गुहेचा शोध लावला.