नवी दिल्ली -देशातील प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. १२ मेनंतर ही वाहतूक सुरू होणार आहे. सुरुवातीला दिवसाला केवळ १५ गाड्या धावणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरळीत करण्यात येईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
या 'विशेष गाड्या' नवी दिल्लीमधील रेल्वे स्थानकावरून सुटतील. तिथून सुटल्यानंतर या गाड्या देशातील दिब्रुगड, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरूवअनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल,अहमदाबाद आणि जम्मू तावी या रेल्वेस्थानकांवर जातील.
'११ मे'ला सायंकाळी चारनंतर या गाड्यांमध्ये आरक्षण करता येईल. केवळ आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरूनच या गाड्यांमध्ये आरक्षण करता येणार आहे. रेल्वे स्थानकांवरील तिकीट बुक करण्याची काऊंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्यांचे तिकीट केवळ ऑनलाईन पद्धतीने काढता येणार आहे. याशिवाय, रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटही देण्यात येणार नसून, केवळ तिकीट असणाऱ्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. प्रवाशांना मास्क घालणे अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच, प्रवासापूर्वी सर्व प्रवाशांची स्क्रीनिंग केली जाणार आहे. केवळ कोरोनाची लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे.