नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ''फाळणी' ही आधुनिक भारतातील सर्वांत मोठी चूक' असल्याचे म्हटले आहे. फाळणी झालीच नसती तर, आज जम्मू-काश्मीरविषयी चर्चा करण्याची गरजच पडली नसती, असे ते म्हणाले. ते विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमावेळी बोलत होते.
महात्मा गांधीजींनी म्हटले होते, जर फाळणी झाली तर ती केवळ त्यांच्या मृत्यूनंतरच होऊ शकेल. ते नाराज झाले होते आणि त्यानंतर भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनी बंगालला निघून गेले,' असे सिंह म्हणाले.
हेही वाचा - पाकिस्तानला युद्ध नको असेल तर, त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा - आठवले
'केवळ काही लोकांच्या टोकाच्या महत्त्वाकांक्षांमुळे फाळणी घडून आली, हे आपण समजून घेतले का? बहुसंख्य लोकांनी फाळणीला विरोध केला होता. जर ही फाळणी झालीच नसती तर, आज जम्मू-काश्मीरविषयी चर्चा करण्याची गरजच पडली नसती. तसेच, आर्टिकल ३७० ची तरतूदही करण्यात आली नसती आणि ती संपवण्याचीही गरज पडली नसती. आपण पाहू शकतो की, आपण किती पुढारलो आहोत किंवा मागासले आहोत...तेही इतिहासात झालेल्या एका अपघातामुळे!,' असे सिंह म्हणाले.
यानंतर सिंह यांनी 'फाळणीच्या आधारावर दोन देश तयार करणे' कसे निरर्थक ठरले, हे सांगितले. बांग्लादेशाच्या निर्मितीनंतर हे पुन्हा सिद्ध झाले, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला आरएसएस नेते इंद्रेश कुमारही उपस्थित होते. इंद्रेश यांनी पाकिस्तान दिवसेंदिवस कमजोर होत चालल्याचे म्हटले होते. तसेच, अनेक तज्ज्ञही पाकिस्तानच्या विनाशाविषयी भाकिते वर्तवत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
हेही वाचा - येत्या काळात पाकिस्तानचे आणखी ५-६ तुकडे होतील - आरएसएस नेते
'भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यांची १९७१ मध्ये पुन्हा फाळणी झाली. आता पाकिस्तान आणखी ५-६ तुकडे होण्याच्या टोकावर आहे. पश्तूनिस्तान, बलुचिस्तान, सिंध वेगळे होऊ पहात आहेत,' असे इंद्रेश यांनी म्हटले.