पणजी - भारतीय जनता पक्षात राहुनही पक्षाच्या बाहेर मान्यता असणारे अटलबिहारी वाजपेयीनंतरचे दुसरे नेते म्हणजे मनोहर पर्रिकर. हिंदुत्ववादी विचारधारा बाळगूनसुद्धा उदारमतवादी नेते म्हणून पर्रिकरांची ओळख होती. गोव्यासारख्या छोट्या राज्याचे मुख्यमंत्री असणारे पर्रिकर देशाच्या राजकारणातही आपला ठसा उमटवून गेले. वयाच्या त्रेसस्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्या वयात इतर नेत्यांची कारकिर्द बहरते त्या वयात पर्रिकर या जगातूनच निवृत्त झाले आहेत.
मनोहर गोपालकृष्ण पर्रिकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ ला गोव्यातील मापुसा इथं झाला. एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या पर्रिकरांचं माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातच झालं. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ या उजव्या विचाराच्या संघटनेशी त्यांचा लहाणपणीच संबंध आला. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांशी ते बांधले गेले.
आयआयटी बॉम्बे इथून १९७८ ला त्यांनी मेटॅलार्जिकल इंजिनियरींगमध्ये शिक्षण घेतलं. शिक्षण घेऊन ते गोव्यात परतले. मापुसा इथच त्यांनी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला आणि सोबतच आरएसएसचं काम सुद्धा. वयाच्या २६ व्या वर्षी ते त्यांच्या विभागाचे संघचालक झाले. राम जन्मभुमीच्या आंदोलनातही पर्रिकरांनी सक्रिय सहभाग घेतला होता.