नवी दिल्ली :देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संसदेची स्थायी समिती उद्या (बुधवार) बैठक घेणार आहे. या बैठकीला आरोग्य मंत्रालयातील अधिकारी, आणि एआयआयएमएसचे संचालक डॉ. रणदीप गुलेरियाही उपस्थित असतील. राज्यसभेच्या वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली.
काँग्रेस खासदार आनंद शर्मा हे या स्थायी समितीचे प्रमुख आहेत. या बैठकीला देशातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी केंद्राने घेतलेल्या निर्णयांबाबतही चर्चा होणार आहे. यापूर्वी जुलैमध्ये याबाबत बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीला कोरोना उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या उच्च दरांविषयी, तसेच या औषधांच्या काळ्या बाजाराविषयी चर्चा करण्यात आली होती.