महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अर्थसंकल्प २०२० : प्राप्तीकरामध्ये सामान्यांना दिलासा; सोमवारपर्यंत लोकसभेचे कामकाज स्थगित..

Parliament Budget Session 2020 LIVE
LIVE : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२०...

By

Published : Feb 1, 2020, 9:26 AM IST

Updated : Feb 1, 2020, 1:49 PM IST

13:45 February 01

लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित

लोकसभेचे कामकाज ३ फेब्रुवारी २०२० पर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

13:35 February 01

पॅनकार्ड देण्याची प्रक्रिया अधिक सुरळीत करणार

'आधारकार्ड'च्या आधारावर लवकरात लवकर पॅनकार्ड उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार.

13:33 February 01

सेन्सेक्समध्ये ५८२.८७ अंकांची घसरण

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली आहे. ५८२.८७ अंकांनी कोसळून सेन्सेक्स ४०,१४०.६२ अंकांवर आला आहे.

13:27 February 01

लाभांश वितरण कर हटवला, कंपन्यांना डीडीटी देण्याची गरज नाही

13:22 February 01

विविध प्रकारच्या आयकर कपातींना काढून टाकले

कर प्रणाली सुलभ करण्यासाठी आणि करांचे दर कमी करण्यासाठी १०० हून अधिक प्रकारच्या आयकर सूट आणि कपातींपैकी ७० कपाती काढून टाकण्यात आल्या आहेत.

13:21 February 01

नव-उद्योगांसाठी असणारी वार्षिक उलाढाल मर्यादा २५ कोटींवरून १०० कोटींवर

13:08 February 01

प्राप्तीकरात मोठी कपात; पाच ते साडेसात लाखांच्या कमाईवर लागणार १० टक्के कर

पाच ते साडेसात लाखांपर्यंतच्या कमाईवरील कर हा २० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणण्यात आला आहे. ७.५ ते १० लाखांपर्यंतच्या कमाईवरील कर हा १५ टक्के असणार आहे. तर, १० ते १२.५ लाख कमाईवरील कर हा ३० टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आला आहे. १२.५ ते १५ लाखांपर्यंत कमाई असणाऱ्यांना २५ टक्के, तर १५ लाखांपेक्षा जास्त कमाई असणाऱ्यांना पूर्वीप्रमाणे ३० टक्के कर द्यावा लागणार आहे. ५ लाखांहून कमी कमाई असणाऱ्यांना कर लागू होणार नाही. 

13:05 February 01

जगात सर्वात कमी कॉर्पोरेट टॅक्स रेट लागू करणार

नव्या कंपनीसाठी कॉर्पोरेट टॅक्स रेट हा कमी करून १५ टक्के करणार, जो जगातील सर्वात कमी आहे.

13:00 February 01

येत्या आर्थिक वर्षामध्ये 'जीडीपी'मध्ये १० टक्क्यांनी वाढ करण्याचे सरकारचे उद्दिष्ट

12:56 February 01

'एलआयसी'मधील सरकारचा हिस्सा विकण्याचा प्रस्ताव

आयपीओ मार्फत भारतीय आयुर्विमा संस्थेमधील सरकारचा हिस्सा विकण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी मांडला.

12:51 February 01

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्समध्ये ३५.२१ अंकांनी घसरण

सेन्सेक्स ३५.२१ अंकांनी घसरून ४०,६८८.२८ अंकांवर स्थिरावला

12:44 February 01

बँकांसाठी ३ लाख ५० हजार कोटींचा निधी, ठेवींवर मिळणार पाच लाखांपर्यंत विमा सुरक्षा

बँकांमधील ठेवींवर आता पाच लाखांपर्यंत विमा सुरक्षा मिळणार आहे. याआधी एक लाखांपर्यंत विमा सुरक्षा मिळत होती.

12:44 February 01

जम्मू-काश्मीरसाठी ३०,७५७ कोटी, तर लदाखसाठी ५,९५८ कोटी रूपयांची तरतूद

जम्मू काश्मीर आणि लदाखच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील राहील. या भागांच्या विकासासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरसाठी ३०,७५७ कोटी, तर लदाखसाठी ५,९५८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

12:43 February 01

२०२२ मध्ये होणाऱ्या जी-२० शिखर संमेलनासाठी १०० कोटींची तरतूद

२०२२ मध्ये होणाऱ्या जी-२० शिखर संमेलनाचे यजमानपद भारत भूषवणार आहे. या संमेलनाच्या तयारीसाठी १०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

12:36 February 01

तिरूवल्लूर यांनी सांगितलेल्या पाच रत्नांना मोदींनी पूर्ण केले

सीतारामन यांनी तामिळ कवी तिरूवल्लूर यांची एक कविता वाचून दाखवली. यात उल्लेखलेल्या पाच रत्नांना मोदींनी पूर्ण केले आहे असे म्हणताच, सभागृहात पुन्हा गोंधळ झाला.

12:34 February 01

राष्ट्रीय सुरक्षेला मोदी सरकारचे प्राधान्य

राष्ट्रीय सुरक्षेला मोदी सरकारचे प्राधान्य राहिले आहे, असे म्हणताच विरोधकांनी सभागृहात गदारोळ सुरू केला. अर्थमंत्री म्हणाल्या, की आम्ही एक स्वच्छ आणि भ्रष्टाचार-मुक्त असे सरकार देशाला दिले आहे. आम्ही महिलांच्या समस्यांवर लक्ष दिले आहे.

12:32 February 01

पर्यावरणासाठी ४ हजार कोटी रूपयांची तरतूद

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जातील. यासाठी चार हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

12:23 February 01

पाच पौराणिक जागेवर बनणार संग्रहालये, पर्यटनासाठी २,५०० कोटींची तरतूद

देशभरातील पाच पौराणिक जागेवर संग्रहालयांची स्थापना होणार आहे. यामध्ये हस्तिनापूर, शिवसागर, डोलावीरा, आदिचेल्लनूर आणि राखीगढीचा समावेश आहे. यासोबतच रांचीमध्ये ट्रायबल संग्रहालयाची स्थापना होणार. तसेच, लोथलमध्ये मॅरीटाईम संग्रहालयाची स्थापना होणार.

12:22 February 01

दिव्यांग आणि वयोवृद्धांसाठी ९,५०० कोटी रूपयांची तरतूद

12:22 February 01

अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी ८५ हजार कोटी रुपयांची तरतूद

यासोबतच, अनुसूचित जमातींसाठी ५३ हजार ७०० कोटींची तरतूद.

12:19 February 01

पोषण योजनेसाठी ३५,६०० कोटी रूपयांची तरतूद

मातांच्या आरोग्यासाठी पोषण महत्त्वाचे आहे. पोषण अभियानाअंतर्गत ६ लाखांहून अधिक अंगणवाडी कार्यकर्त्यांना स्मार्टफोन दिले आहेत. त्या गावातील मातांचे आणि लहानग्यांच्या पोषणाबाबत माहिती या स्मार्टफोनच्या माध्यमातून देत असतात.

12:18 February 01

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला चांगला प्रतिसाद - सीतारामन

मुलांपेक्षा मुली अधिक प्रमाणात शाळेत जात आहेत. ९८ टक्के मुली या नर्सरी लेव्हलला शाळेत जात आहेत. मुली सध्या कोणत्याच क्षेत्रात मुलांच्या मागे नाहीत.

12:13 February 01

'भारतनेट' योजनेसाठी सहा हजार कोटी रूपयांची तरतूद

12:11 February 01

वीज आणि अक्षय उर्जा क्षेत्रासाठी २२ हजार कोटींची तरतूद..

वीजेचे मीटर प्रीपेड करणार. टप्प्याटप्प्याने जुने मीटर कालबाह्य करणार. स्मार्ट मीटरद्वारे वापरकर्त्याला आपला पुरवठादार आणि वीजेचे दर ठरवता येतील.

12:10 February 01

एअर ट्राफिक कमी करण्यासाठी १०० नवी विमानतळे बांधणार..

12:03 February 01

वाहतुकीच्या पायाभूत सुविधांसाठी १.७ लाख कोटी रूपयांची तरतूद

२०२४ पर्यंत सहा हजार किलोमीटरचे महामार्ग बनवले जातील. २,५०० किलोमीटर एक्सप्रेस महामार्ग. ९,००० किलोमीटर इकॉनॉमिक कॉरिडोअर आणि २००० किलोमीटर स्ट्रेटेजिक महामार्ग बनवले जातील. 'दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे', 'चेन्नई-बंगळुरू एक्सप्रेस वे'चीही घोषणा करण्यात आली. 

11:57 February 01

उद्योगांच्या विकासासाठी २७,३०० कोटी रूपयांची तरतूद..

11:55 February 01

उद्योजकांसाठी स्थापन होणार 'इन्वेस्टमेंट क्लिअरंस सेल'..

उद्योजकता ही भारताची ताकद आहे. त्यामुळेच, उद्योजकांसाठी इन्वेस्टमेंट क्लिअरंस सेल स्थापन करणार. ज्याद्वारे नवउद्योजकांना गुंतवणूकपूर्व सल्लागार, जमीन बँकांविषयी माहिती आणि राज्यस्तरावर मंजुरी मिळवून देणारी सुविधा उपलब्ध होईल.

11:48 February 01

शिक्षणासाठी ९९,३०० कोटी; तर कौशल्य विकासासाठी तीन हजार कोटींची तरतूद

पीपीपी मॉडेलवर आधारित कॉलेज बनवणार. वंचितांसाठी ऑनलाईन डिग्री योजना. स्टडी इन इंडिया कार्यक्रम लागू करणार. राष्ट्रीय पोलीस महाविद्यालय आणि राष्ट्रीय न्यायिक विज्ञान विश्वविद्यालयाची घोषणा.

11:48 February 01

स्वच्छ भारत योजनेसाठी १२,३०० कोटींची तरतूद

11:46 February 01

आरोग्य सेवांसाठी ६९ हजार कोटींची तरतूद..

आरोग्य सेवांसाठी ६९ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ११२ जिल्ह्यांमध्ये सरकार आयुष्मान रूग्णालये बनवणार. क्षयरोगाचे समूळ उच्चाटन हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

11:42 February 01

कृषी, सिंचन आणि ग्रामीण विकासासाठी २.८३ लाख कोटी रूपयांची तरतूद..

कृषी, संलग्न उपक्रम, सिंचन आणि ग्रामीण विकास या क्षेत्रासाठी २.83 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

11:38 February 01

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध...

२०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. देशातील २० लाख शेतकऱ्यांना सोलार पंप देण्यात येणार आहेत. तसेच, नाशवंत वस्तूंची वाहतूक वेगाने होण्यासाठी किसान रेलची स्थापना करणार..

11:35 February 01

भारताने २७१ दशलक्ष लोकांची गरीबी दूर केली - निर्मला सीतारामन

11:29 February 01

२०२० मधील अर्थसंकल्प हा नागरिकांचे उत्पन्न आणि त्यांची खरेदीक्षमता वाढवण्यावर भर देईल - सीतारामन

11:28 February 01

'जीएसटी'मुळे देशातील कुटुंबाची महिन्याला ४ टक्के बचत होत आहे - सीतारामन

11:23 February 01

केंद्र सरकारवरील कर्ज हे २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये कमी झाले...

केंद्र सरकारवर २०१४ मध्ये असलेले ५२.२ टक्के कर्ज, हे २०१९ मध्ये कमी होऊन ४८.७ टक्क्यांवर आले आहे.

11:11 February 01

अरुण जेटलींना श्रद्धांजली वाहत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली भाषणाला सुरुवात

दिवंगत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात केली. जेटलींनी मांडलेली जीएसटीची संकल्पना ही ऐतिहासिक होती, असे त्या म्हणाल्या. जीएसटीमुळे वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात कार्यक्षमता वाढली आहे. तसेच निरीक्षक राज नाहीसा झाल्याचा फायदा सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) झाला आहे. जीएसटीमुळे ग्राहकांना वार्षिक 1 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. एक एप्रिलपासून जीएसटीच्या संरचनेमध्ये सुधारणा करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

11:02 February 01

लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर

10:52 February 01

केंद्रीय मंत्रिमंडळाची अर्थसंकल्पाला मंजूरी; थोड्याच वेळात होणार लोकसभेत सादर..

केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाला मंजूरी दिली आहे. थोड्याच वेळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करतील.

10:39 February 01

जानेवारीत जीएसटीचे १.१ लाख कोटींहून अधिक संकलन

वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन हे जानेवारीत १.१ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. सलग तिसऱ्या महिन्यात जीएसटीचे संकलन हे १ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले असून देशातील जीएसटीचे संकलन हे ११.५ टक्क्यांनी वाढले आहे, तर आयजीएसटीचे संकलन हे ६ टक्क्यांनी कमी झाल्याचे सूत्राने सांगितले. केंद्र सरकारने चालू महिन्यात १.१ लाख कोटी रुपये जीएसटी संकलनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. वाढती वित्तीय तूट आणि कर संकलनाचे घटलेले प्रमाण लक्षात घेता केंद्र सरकारने कर संकलनासाठी विविध प्रयत्न केले आहे.

10:35 February 01

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी आणि कुटुंबीय संसदेमध्ये दाखल...

10:28 February 01

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत दाखल

10:24 February 01

केंद्रीय अर्थसंकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दाखल

10:17 February 01

अर्थसंकल्पाच्या छापील प्रती संसदेत आणल्या..

अर्थसंकल्पाच्या छापील प्रती संसदेत आणल्या गेल्या आहेत. थोड्याच वेळात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार आहे.

10:04 February 01

मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन अन् केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर संसदेमध्ये दाखल

09:55 February 01

केंद्रीय मंत्रीमंडळाचे सचिव राजीव गौबा संसदेत दाखल..

थोड्याच वेळात पार पडणाऱ्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी केंद्रीय मंत्रीमंडळाचे सचिव राजीव गौबा हे संसदेत दाखल झाले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामनही राष्ट्रपतींकडे अर्थसंकल्पाची प्रत सादर केल्यानंतर, संसदेकडे रवाना झाल्या आहेत.

09:54 February 01

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात घसरण..

आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स १४० अंकांनी घसरून ४०,५७६ अंकांवर आला आहे. तर, निफ्टी १२६.५० अंकांनी घसरून ११,९१० अंकांवर आले आहे.

09:46 February 01

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली..

09:27 February 01

संसदेच्या सभागृहात सकाळी १०.१५ वाजता होणार केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक

आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सकाळी १०.१५ वाजता संसदेच्या सभागृहात केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडणार आहे.

09:20 February 01

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन घेणार राष्ट्रपती रामनाथ कोविंदांची भेट..

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थ मंत्रालयात दाखल झाल्या आहेत. थोड्याच वेळात त्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील.

07:42 February 01

नवी दिल्ली- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरू झाले आहे. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Last Updated : Feb 1, 2020, 1:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details