नवी दिल्ली - ‘लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदीय समितीच्या बैठका नियमांमध्ये औपचारिकरीत्या बदल केल्याशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होऊ शकत नाहीत’, असे आपल्याला कळवल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी बुधवारी म्हटले आहे. ‘असे केल्यास सरकारच्या कृतींचे योग्य प्रकारे निरीक्षण करण्याची शक्यता धूसर बनेल,’ असे अध्यक्षांनी म्हटल्याचे थरूर यांनी ट्विट करून सांगितले आहे.
थरूर यांच्या अध्यक्षतेखालील माहिती तंत्रज्ञान समितीच्या संसदीय समितीची 17 जूनला बैठक होणार होती. यादरम्यान माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सरकारच्या कोरोनव्हायरस-ट्रॅकिंग 'आरोग्य सेतू अॅप'बद्दल माहिती देण्यास बोलावले होते. यामध्ये या अॅपसंबंधी माहितीची सुरक्षा आणि नागरिकांच्या गोपनीयतेशी संबंधित मुद्दे आणि समस्यांवर चर्चा होणार होती.
याआधी माहिती तंत्रज्ञान पॅनेलसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थरूर यांची बैठक होणार होती. मात्र, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद व्हावा की, थेट समोरासमोर संवाद व्हावा, याविषयी स्पष्टता नसल्याने ती रद्द करण्यात आली. कारण, यासाठी लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी ‘संसदीय समितीच्या बैठकांसाठीच्या नियमांमध्ये औपचारिकरीत्या बदल होण्याची आवश्यकता आहे’, असे आपल्याला कळवल्याचे थरूर यांनी ट्विटद्वारे सांगितले.