पटना - बेगुसराय येथे रुग्णालयातील आयसोलेशनमध्ये काम करणाऱ्या एका पॅरामेडिक स्टाफच्या नर्सने तिच्या शेजाऱ्यांनी तिला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. शेजारच्या घराला लागून असलेल्या गेटचा वापर करून तिने घरात प्रवेश केल्यास त्यांनाही कोरोनाची लागण होणार असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नीलू कुमारी असे मारहाण झालेल्या नर्सचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी शेजाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोरोना : बिहारमध्ये आयसोलेशन वार्डमध्ये काम करणाऱ्या नर्सला शेजाऱ्यांकडून मारहाण - assault
बिहारच्या बेगुसराय सदर रुग्णालयात कार्यरत एका नर्सने तिच्या शेजाऱ्यांविरुद्ध पोलिसात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. ती रुग्णालयातून काम करून घरी आल्यानंतर तिने नेहमीच्या गेटऐवजी घरातील दुसऱ्या गेटने प्रवेश करावा अन्यथा आम्हाला कोरोना होईल, असे शेजाऱ्यांनी म्हटले असल्याची तक्रार तिने पोलिसात दाखल केली होती.
नीलू कुमारी हिचे मीरगंज परिसरातीलच अमूल्य सिंहशी लग्न झाले असून ती बेगूसराय सदर रुग्णालयात सहाय्यक नर्स (एएनएम) म्हणून कार्यरत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात दाखल झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. नीलू कुमारीदेखील आयसोलेशन कक्षात काम करते. मात्र, याच कारणावरून तिच्या शेजाऱ्यांनी 'तू तिथे काम करतेस, तूलाही कोरोना झाला आहे. त्यामुळे तू घरात येतेस तेव्हा आमच्या घराला लागून असलेल्या गेटचा वापर करू नकोस, दुसऱ्या गेटमधून जा, नाहितर आम्हालाही कोरोना होईल,' असे सुनावत तिचा घरात जाण्याचा मार्ग रोखला, अशी तक्रार नीलू कुमारी यांनी केली. तसेच "मी आंघोळ केल्यास पाणी बाहेर उडाल्याने आम्हालाही कोरोनाची लागण होईल," असेही म्हटलाचे तिने रागाने पत्रकारांना सांगितले.
या प्रकरणी नीलू कुमारीच्या तक्रारीवरून शेजारी राहणारे माजी नगरसेवक आणि दोन जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एसएचओ अमरेंद्र कुमार झा यांनी सांगितले. तर, दुसरीकडे नीलू कुमारी यांच्या शेजाऱ्यांनी तिने लावलेले आरोप फेटाळून लावले असून हा फक्त 'क्षुल्लक वाद' असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे असल्याचे झा यांनी सांगितले. पोलिसांनी यासंदर्भात चौकशी सुरू केली असून पुढील निष्कर्षांनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.