हैदराबाद -मागील चार महिन्यांपासून जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आणखी किती दिवस कोरोनाचा प्रभाव राहील सांगता येत नाही. या काळात अबालवृद्धांसह सर्व नागरिक लॉकडाऊनमुळे घरात अडकून पडले आहेत. छोट्या मोठ्या आरोग्याच्या तक्रारींसाठी दवाखान्यात जाण्यास अडचणी येत आहेत. अनेक दवाखानेही बंद आहेत. अशा काळात टेलिमेडिसीन हा पर्याय मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवत आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे घरी बसल्या डॉक्टरांशी चर्चा करता येऊ शकते. डॉक्टरांचा सल्ला घेवून त्यानुसार उपचार सुरू करता येतात. दवाखान्यात जाण्यासाठी लागणारा वेळ आणि पैशाचीही बचत होते.
मॅसाच्युसेट जनरल हॉस्पीटलमधली टेलिहेल्थ केंद्राचे संचालक ली शॉम यांच्या म्हणण्यानुसार व्हर्च्यूअल म्हणजेच रुग्ण घरी असताना जर डॉक्टरांशी चर्चा करत असेल तर त्यामुळे वेळ आणि अंतराचे अडथळे दुरु होतात. दोघांमध्ये कितीही अंतर असो संवाद होऊ शकतो. त्यामुळे कमी किमतीत रुग्णांकडे अधिक चांगले लक्ष देता येते. ही पद्धती पारंपारिक पद्धतीपेक्षा सहज आणि सोपी आहे, तसेच अशा महामारीच्या काळात तर याचा अधिकच उपयोग होतो, असे ते म्हणाले.
नागरिकांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या सध्याच्या काळात आणि भविष्यात जास्तीत जास्त फायदा घ्यावा. त्यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच बदलून जाईल, असे ली म्हणाले.