पणजी - गोवा विधानसभेच्या ४ पोटनिवडणुकांमध्ये भाजप ३ ठिकाणी तर काँग्रेस १ जागेवर विजय मिळवला आहे. म्हापसा, मांद्रे, शिरोडा आणि पणजी हे मतदारसंघ विविध कारणांमुळे रिक्त झाले होते. त्यामुळे येथे पोटनिवडणूक घेण्यात आली. मांद्रे, शिरोडा आणि म्हापसा या विधानसभा मतदासंघात लोकसभेबरोबर तर पणजी विधानसभा मतदारसंघात वेगळी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निकालावार गोवा सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले होते.
पणजी विधानसभेची जागा जिंकण्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेसने २५ वर्षांत विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे. १९९४ पासून मनोहर पर्रीकर भाजपच्या तिकिटावर निवडून येत असत. त्यांच्या निधनाने गोवा विधानसभेची ही जागा रिक्त झाली होती. आज झालेल्या मतमोजणीत या मतदारसंघात काँग्रेसचे बाबूश मोन्सेरात विजयी झाले आहेत. त्यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, असे असले तरी उत्तर गोव्यातील म्हापसा आणि मांद्रे विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने घवघवीत यश प्राप्त केले आहे. म्हापसात जोशूआ डिसोझा तर मांद्रेतून दयानंद सोपटे निवडून आले. तर शिरोडा विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर ६६ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे उमेदवार दिलीप ढवळीकर यांचा पराभव केला आहे.