नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यानंतर त्यांच्या एका मंत्र्यानी भारताला धमकावले आहे. 'आमची दोन्ही देशादरम्यान शांतता ठेवण्याची इच्छा आहे. मात्र आमच्या या इच्छेला भारताने कमजोरी समजू नये. जर भारताने युध्दाची सुरवात केली. तर त्याचा शेवट आम्ही दिल्लीमध्ये येऊन करू', असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या माहिती आणि प्रसारण विभागाच्या विशेष सहाय्यक फिरदौस आशिक अवान यांनी म्हटले आहे.
...तर युध्दाचा शेवट दिल्लीमध्ये येऊन करू', पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यानंतर त्यांच्या एका मंत्र्यानी भारताला धमकावले आहे.
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान कावराबावरा झाला आहे. संयुक्त राष्ट्राच्या परिषदेमधून काहीच हाती न लागल्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ आहे. इस्लामिक राष्ट्रांनी मोदींना पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यावर फिरदौस आशिक अवान यांनी टीका केली. काही राष्ट्र आपल्या हितासाठी काश्मीरमधील नागरिकांवर होत असलेल्या आत्याचाराकडे दुर्लक्ष करत असल्याचं त्या म्हणाल्या.
जगाने जरी दुर्लक्ष केले असले तरी पाकिस्तान काश्मीरी नागरिकांसोबत आहे. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुध्द पाकिस्तान आवाज उठवत राहणार. यासाठी पाकिस्तान एकता दिवस साजरा करणार आहे. येत्या आठवड्यामध्ये पंतप्रधान इम्रान खान राष्ट्राला संबोधीत करतील, असे त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या 11 प्रस्तांवाचे उल्लघंन केल्याचा आरोप त्यांनी केला.