नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तानमधील प्रवाशांची ने-आण करणारी समझौता एक्सप्रेस पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. पाकिस्ताने लाहोर ते दिल्ली धावणारी समझौता एक्सप्रेस रद्द केली आहे.पाकिस्तनी माध्यमांनी ही माहिती दिली आहे.
भारताने आर्टिकल ३७० रद्द करून जम्मू-काश्मीर पुनर्रचनेचे विधेयक संसदेत मंजूर केले. भारत सरकारने उचललेल्या या पावलामुळे पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून समझौता एक्सप्रेस रद्द करण्यात आली.
आर्टिकल ३७० रद्द करण्याच्या निर्णयानंतर गंभीर परिणाम होतील, असा इशारा पाकिस्तानने भारताला दिला होता. तर पाकिस्तानने भारतीय राजदूताला भारतात परतण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, भारताशी राजनैतिक संबंध तोडण्याचा आणि द्विपक्षीय व्यापाराला स्थगिती देणाचा निर्णयही घेण्यात आला आहे.
यापुर्वी पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांवर भारताने केलेल्या हवाईह हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पाकिस्तानकडून समझौता एक्सप्रेस रद्द करण्यात आली. त्यानंतर भारताने देखील पाकिस्तानात जाणारी समझौता एक्सप्रेस रद्द केली होती.