महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कुलभूषण जाधव खटला: शिक्षेच्या पुनर्विचारासाठी पाक सरकारची इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका

पाकिस्तानच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाने सरकारी अध्यादेशाच्या आधारावर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानुसार लष्करी न्यायालयाच्या निर्णयाचा आढावा घेण्यासाठी कौन्सिलरची नियुक्ती करावी, असे याचिकेत म्हटले आहे.

कुलभूषण जाधव
कुलभूषण जाधव

By

Published : Jul 22, 2020, 5:04 PM IST

इस्लामाबाद -भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या खटल्यात कौन्सिलर नेमण्यासाठी पाकिस्तानी सरकारने इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कुलभूषण प्रकरणी प्रामाणिकपणे खटला चालविण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले होते. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पाकिस्तानने याचिका दाखल केली आहे.

पाकिस्तानच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाने सरकारी अध्यादेशाच्या आधारावर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानुसार लष्करी न्यायालयाच्या निर्णयाचा आढावा घेण्यासाठी कौन्सिलरची नियुक्ती करावी, असे याचिकेत म्हटले आहे. पाकिस्तान कुलभूषण जाधव यांना तिसऱ्यांदा कौन्सिलर सहाय्य देणार असल्याचे वृत्त मागील आठवड्यात आले होते. त्यानंतर आता पाकिस्तानने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांच्याशी कोणत्याही दबावाविना पाकिस्तान चर्चा करु देत नाही. भारतीय अधिकारी आणि कुलभूषण जाधव यांची चर्चा सुरु असताना पाकिस्तानी अधिकारी आणि सुरक्षा रक्षक जवळ उभे हाततात. तसेच त्यांचे वर्तन भीतीदायक असल्याने कुलभूषण जाधव तणावात आहेत. ही चर्चा पाकिस्तानकडून रेकॉर्डही करण्यात येत आहे. असे म्हणत भारताने पाकिस्तानच्या या कृतीचा विरोध दर्शवला. तसेच कौन्सिलर सहाय्य देण्यास काहीच अर्थ राहत नसल्याचे म्हटले.

भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव कथित हेरगिरीच्या आरोपाखाली 2016 पासून पाकिस्तानच्या अटकेत आहेत. त्यांना बलुचिस्तान प्रांतातून अटक करण्यात आले होते. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. जाधव यांच्यावरील सर्व आरोप खोट असून त्यांना मुक्त करावे, या मागणीसाठी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details