नवी दिल्ली - काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारताच्या ९ सैनिकांना ठार केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी या संदर्भात एक ट्वीट केले आहे.
भारताच्या ९ सैनिकांना ठार केल्याचा पाकिस्तानी लष्कराचा खोटा दावा
काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारताच्या ९ सैनिकांना ठार केल्याचा पाकिस्तानी लष्कराने दावा केला आहे.
सीमेवर झालेल्या गोळीबारात आपला १ सैनिक आणि ३ नागरिक ठार. तर २ सैनिक आणि ५ नागरिक जखमी झाल्याचे जनरल आसिफ गफूर यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. तर भारताचे 9 सैनिक ठार झाल्याचा आणि सैन्याचे २ बंकर नष्ट केल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र त्यांचा हा दावा खोटा असून या चकमकीत २ भारतीय सैनिक हुतात्मा झाल्याची माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे.
काश्मीरची स्वायतत्ता काढून घेतल्यापासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जूरा अथमुकाम, कुंदलशाही, येथील दहशतवादी तळांना भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले. दहशतवादी भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. काल(शनिवारी) रात्रीपासून गोळीबारा सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.