श्रीनगर- भारत पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानी सैन्याने आज पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू काश्मीरच्या उरी भागात पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. गेल्या दोन दिवसांमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे.
काल (सोमवारी) देखील पूंछमधील दोन ठिकाणी पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याच्या घटना झाल्याची माहिती भारतीय सैन्याच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
नुकतेच भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. याबाबत संयुक्त राष्ट्राकडून देखील पाकिस्तानच्या हाती निराशाच लागली आहे. भारताने घेतलेल्या निर्णयाला अनेक राष्ट्रानी पाठिंबा दिला असून त्यांनी तो भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले आहे. यासोबतच, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मागील महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. यावेळी काश्मीर प्रश्नावर मध्यस्ती करण्यास तयार असल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी केले होते. मात्र काल डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींवर विश्वास व्यक्त करत, या मुद्यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
या गोष्टीमुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. त्यामुळे, पाकिस्तान अशा कुरापती करत आहे. भारताकडून पाकिस्तानला वारंवार २००३ च्या शस्त्रसंधीचा मान राखण्याचे आवाहन केले जात आहे.