महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानचा यू-टर्न.. म्हणे जैश-ए-मोहम्मदचे पाकिस्तानात अस्तित्वच नाही

पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून मसुद अजहरच्या भावाला आणि मुलाला प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतले होते. यानंतर एकच दिवसात गफूर यांनी हा दावा केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर

By

Published : Mar 6, 2019, 11:55 PM IST

इस्लामाबाद - जैश-ए-मोहम्मद संघटना पाकिस्तानमध्ये अस्तित्वातच नसल्याचा नवा दावा पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी पाकिस्तान सरकारने जैशचा प्रमुख अजहर याच्याशी संपर्क केल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर ४ दिवसांनी गफूर यांनी हा दावा केला आहे.

कुरेशी यांनी म्हटले होते, की पाकिस्तान सरकारने जैशचा प्रमुख मसुद अजहरशी संपर्क केला असून त्याने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. कुरेशी यांनी अन्य एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते, की अजहर पाकिस्तानमध्येच आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्याची तब्येत इतकी खराब आहे, की त्याला घर सोडणेही शक्य नाही.

पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून मसुद अजहरच्या भावाला आणि मुलाला प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतले होते. यानंतर एकच दिवसात गफूर यांनी हा दावा केल्याने चर्चेला उधाण आले आहे. पुलवामा येथील आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात भारताच्या सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान हुतात्मा झाल्यानंतर पाकिस्तानवर दहशतवाद्यांना पाठिशी न घालण्यासाठी जागतिक स्तरावरून दबाव वाढला आहे. त्यामुळे हे नवनवे दावे येत आहेत का असा प्रश्न आता विचारला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details