नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी भारत दोन आठवड्यांच्या कठीण काळात प्रवेश करीत असून सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे टि्वट केले आहे.
'जगासोबत भारतही दोन आठवडे अवधी असलेल्या कठीण अवस्थेत प्रवेश करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना त्या प्रत्येकाने पाठिंबा दिलाय, यात शंका नाही', असे टि्वट पी.चिदंबरम यांनी केले आहे.
काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांमधील उणीवांकडे सहकार्याच्या भावनेने लक्ष वेधले आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना तपासणी व्हायला हव्यात, यावर साथीची रोगतज्ज्ञ, डॉक्टर आणि जिल्हास्तरीय प्रशासकांनी मत नोंदवल आहे. आक्रमक व सर्वसमावेशक तपासणीची आता गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सरकारने त्यादृष्ट्रीने प्रयत्न सुर केले पाहिजेत, असेही चिदंबरम म्हणाले.
'कोरोना'चा फैलाव थांबविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून वेगाने कोरोनाची चाचणी घेण्यासाठी रॅपीड कोरोना टेस्ट काही राज्यात करण्यात येत आहे. डॉक्टर जिवाची बाजी लावून एकेका रुग्णासाठी अहोरात्र काम करत आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणा एकजुटीने करोनाच्या विरोधात उभ्या आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यापासून ते औषधोपचारापर्यंत सर्व सुविधा सज्ज आहेत.