नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चिदंबरम यांच्यावरील अटकेची टांगती तलवार अद्यापही कायम आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर चिदंबरम यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पिटिशन (एसएलपी) दाखल केले होती.
अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावे, यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एन. व्ही. रामणा यांच्यासमोर आज ही याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी रामणा यांनी या प्रकरणावर निर्णय देण्यास नकार दिला. याबाबत तुम्ही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोर दाद मागावी, असा सल्लाही त्यांनी चिदंबरम यांच्या वकिलांना दिला आहे.