नवी दिल्ली - दिल्लीमधील अनाज मंडी येथे रविवारी भीषण आग लागली होती. या आगीत तब्बल ४३ जणांचा मृत्यू झाला होता. यावरून भाजपचे खासदार व दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी आग लागलेल्या इमारतीचा मालक हा आम आदमी पक्षाचा आहे, असे म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी केजरीवाल यांना स्पष्टीकरण मागितले आहे.
राणी झांसी रोडवरील अनाज मंडी येथील फॅक्ट्रीला रविवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. आगीतून तब्बल 50 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. या आगीत 43 जणांचा मृत्यू झाला आहे.
आगीप्रकरणी इमारतीचा मालक रेहान याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंडविधानाच्या कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून येत्या 7 दिवसाच्या आत अहवाल मागितला आहे.
आगीमध्ये जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (पीएमएनआरएफ) प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये पंतप्रधानांनी मंजूर केले आहेत.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मृताच्या कुटुंबीयांसाठी प्रत्येकी 10 लाखांची नुकसान भरपाई तर जखमींना प्रत्येकी 1 लाख आणि मोफत उपचार देण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर भाजप मृताच्या कुटुंबीयांना 5 लाखांची नुकसान भरपाई तर जखमींना 25 हजार रुपये देणार आहे.