श्रीनगर - २०२० सालामध्ये आतापर्यंत जम्मू-काश्मीर सीमेवर तब्बल ९४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. काश्मिरचे पोलीस महानिरिक्षक विजय कुमार यांनी मंगळवारी ही माहिती दिली. जम्मू-काश्मिरच्या शोपियान तुर्कवांगम भागात आज मंगळवार सकाळी, भारतीय जवान आणि दहशतवांद्यामध्ये चकमक झाली. यात भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. याबाबत कुमार पत्रकार परिषदेत माहिती देत होते.
हंदवारामध्ये सापडलेल्या पाकिस्तानच्या नार्को-टेरर मोड्यूलबाबत माहिती देताना कुमार यांनी सांगितले, की याबाबत तपास सुरू असून यामध्ये आणखी लोकांना अटक केले जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानसोबतच दिल्ली, मुंबई आणि पंजाब या राज्यांशीही याचे संबंध असल्यामुळे, गरज पडल्यास आम्ही हे प्रकरण एनआयएकडेही सोपवू, असे कुमार यांनी स्पष्ट केले.
२०२०च्या जूनपर्यंत जम्मू-काश्मिरमध्ये ९० दहशतवाद्यांचा खात्मा.. अनंतनागमध्ये ८ जूनला काँग्रेस सरपंच अजय पंडिता यांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली होती. यामध्ये हिजबुल मुजाहिदीन या संघटनेचा हात असल्याचे कुमार यांनी सांगितले. नुकत्याच मारल्या गेलेल्या उमर या दहशतवाद्याने हे कृत्य केल्याचेही समोर येत आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, मात्र अद्याप बॅलिस्टिक रिपोर्ट येणे बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, ज्या सरपंचांच्या जिवाला धोका आहे, त्यांनी स्वतः पुढे येत पोलीस संरक्षण मागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, एकीकडे भारत-पाकिस्तान सीमेवर लष्कर चांगली कामगिरी बजावत असताना, भारत-चीन सीमेवरील चकमकीत तीन जणांना वीरमरण आले आहे. यामध्ये एका भारतीय अधिकाऱ्यासह दोन जवानांचा समावेश आहे. गलवान व्हॅलीत काल रात्री ही चकमक झाली. दोन्ही देशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरू असतानाच ही चकमक झाल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा :भारत-चीन सीमेवर चकमक, वीरमरण आलेला एक जवान तामिळनाडूचा