चेन्नई -लेबनॉनची राजधानी बैरुत येथे बंदरावर झालेल्या शक्तीशाली स्फोटाने संपूर्ण जग हादरले आहे. बंदरावर ठेवलेल्या धोकादायक अशा अमोनियम नायट्रेट या केमिकलचा स्फोट झाल्याने शेकडो जण ठार झाले असून हजारो नागरिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतातील बंदरांची प्रशासनाकडून झाडाझडती घेण्यात येत आहे. दरम्यान, तामिळनाडूतील चेन्नई शहराजवळील मनाली या ठिकाणी गोदामात तब्बल 740 टन अमोनियम नायट्रेट हे धोकादायक केमिकल साठवून ठेवल्याचे समोर आले आहे. बैरुतमधील स्फोटास जबाबदार असलेले हे अमोनियम नायट्रेट भारतातही विध्वंस घडवू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सीमा शुल्क विभागाने 2015 साली करुर येथील एका केमिकल कंपनीने आयात केलेले अमोनियम नायट्रेट क्लिअरन्ससाठी ताब्यात घेतले होते. अवैधरित्या आयात केल्याचे आढळून आल्याने सर्व माल चेन्नईपासून जवळील मनाली येथील सीमा शुल्क विभागाच्या गोदामात खाली करण्यात आला होता. तब्बल 37 कंटेनरमध्ये हा माल ठेवण्यात आला आहे. यासंबंधी सीमा शुल्क विभागातील सुत्रांनी सांगितले की, धोकादायक माल बिगर रहिवासी भागातील गोदामात ठेवण्यात आला असून, सुरक्षेच्या सर्व उपाययोजना घेण्यात येत आहेत. मात्र, बैरुत येथील स्फोटानंतर सीमा शुल्क विभागाचे धाबे दणाणले आहेत.