गांधीनगर :दक्षिण गुजरातच्या किनारी भागांत राहणाऱ्या सुमारे ५० हजार लोकांना आणि दमणमधील सुमारे चार हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे.
गुजरातच्या किनारी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच लोकांना आपल्या घरामध्येच सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अजूनही अनेकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू असल्याची माहिती महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पंकज कुमार यांनी दिली.
वलसाद, नवसारी, भरुच आणि सूरतला या वादळाचा फटका बसणार आहे. ताशी १०० ते ११० किलोमीटर प्रतितास वेगाने हे वादळ नवसारीला धडकेल. या पार्श्वभूमीवर सर्व मच्छिमारांना समुद्रातून परत बोलावण्यात आले असून, सर्व मिठागरे आणि श्रिंप फार्म कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, असे कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
किनारी भागांमध्ये एनडाआरएफची १५ आणि एसडीआरएफची सहा पथके तैनात करण्यात आली आहेत. यासोबतच, २५० रुग्णवाहिका आणि १७० वैद्यकीय पथकेही तयार ठेवण्यात आली आहेत, असे कुमार यांनी सांगितले.