ढाका– मुस्लीम धर्मगुरुंच्या अंत्यसंस्कारासाठी पोलिसांना विरोध करून तब्बल एक लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित राहिल्याने लॉकडाऊनच्या नियमांचा फज्जा उडाला आहे. सोशल डिस्टंस न पाळता एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र जमा झाल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे.
ब्राह्मणबेरिया जिल्ह्यातील सोरईल तालुक्यातील बेरटोला गावात 'नईब-ए अमीर' मौलाना जुबैर अहमद अन्सारी यांचे त्यांच्या घरी निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ढाका तसेच आजुबाजूच्या परिसरातील हजारो लोक उपस्थित झाले होते.
सोशल डिस्टंसचा फज्जा ; लॉकडाऊन असतानाही अंत्यसंस्कारासाठी जमले १ लाखापेक्षा जास्त लोक पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ब्राह्मणबेरियातील शहादत हुसैन टिटू पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना हा जमाव रोखण्यात अपयश आले. एवढ्या मोठ्या संख्येने जमाव उपस्थित राहिल्याने पोलीस यंत्रणा त्यांना रोखू शकली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
कोणत्याही मास्क शिवाय आणि सोशल डिस्टंस न पाळता एवढ्या संख्येने लोक एकत्र आल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आत्तापर्यंत बांग्लादेशात २१४४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे. तर, यापैकी ८४ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.