नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्हीव्हीआयपी जेट खरेदी केल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. शनिवारी राहुल गांधींनी ट्रकमधून प्रवास करणाऱ्या जवानांचा एक व्हिडिओ शेअर केला. एकीकडे मोदींसाठी 8400 कोटींचे जेट खरेदी करण्यात आले आहे. तर दुसरीकडे जवानांचा जीव धोक्यात घालून त्यांना नॉन बुलेट प्रूफ ट्रकमधून पाठवण्यात येत आहे. हा कसला न्याय, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी खेती बचाओ यात्रेत राहुल गांधींनी ट्रक्टरवरून कृषी विधेयकांचा निषेध नोंदवला होता. या ट्रक्टर रॅलीदरम्यान राहुल गांधीसाठी सोफा तयार करण्यात आला होता. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तेव्हा अनेकांनी राहुल गांधींवर टीका केली होती. यावर राहुल गांधींनी प्रतिउत्तर दिले. मी बसलेला सोफा माध्यमांना दिसला. मात्र, मोदींसाठी विकत घेतलेले 8400 कोटींचे जेट माध्यमांना दिसले नाही. यावरून माध्यमे मोदींना प्रश्न विचारत नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले होते.
आता याच मुद्यांवरून राहुल गांधींनी पुन्हा मोदींना लक्ष्य केले आहे. त्यांनी आपल्या टि्वटरवरून जवानांचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये बुलेट प्रुफ नसेल्या ट्रकमधून जवान जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसून येत आहेत. या क्षणाचा व्हिडिओ शेअर करत, राहुल गांधींनी एकिकडे मोदींसाठी 8400 कोटींचे जेट खरेदी करण्यात आले आहे. तर दुसरीकडे जवानांचा जीव धोक्यात घालून त्यांना नॉन बुलेट प्रूफ ट्रकमधून पाठवण्यात येत आहे. हा कसला न्याय, असे म्हटलं आहे. दरम्यान, राहुल गांधींनी शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे मोदींसाठी खरेदी केलेल्या जेटचा मुद्दा परत चर्चेत आला आहे.
याचबरोबर दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी टि्वट करत मोदींवर निशाणा साधला होता. पंतप्रधानांनी स्वतःसाठी 8400 कोटींचे विमान खरेदी केले. एवढ्या पैशांत सियाचिन-लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी भरपूर गोष्टी खरेदी करता आल्या असत्या. 30,00,000 गरम कपडे, 60,00,000 जॅकेट, हातमोजे, 67,20,000 बूट, 16,80,000 ऑक्सिजन सिलिंडर. पंतप्रधानांना केवळ आपल्या इमेजची चिंता आहे, सैनिकांची नाही, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले होते.